Sunday, January 29, 2012

वेदनेची अनुभूती


'सर्व ठिकाणी उभी वा बसलेली बुद्ध-मूर्ती या ठिकाणी अशी झोपलेली पाहून अस्वस्थ व्हायला होत. वेदनेची अस्पष्टशी धार अंतःकरण कापून जाते. टपोरे रक्ताचे थेंब टपटपू लागतात. बधीर जीभ ते थेंब चाटू लागते....'
आजही आठवत हे वर्णन. कोसला कादंबरीतल. इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात होता या कादंबरीतला एक उतारा. त्यातच वाचला होता हा मजकूर. कोसला कादंबरी मी अजून वाचलेली नाही. पण त्या वेळी पाठ्यपुस्तकात वाचलेला हा उतारा मनावर कोरला गेला आहे.
कदाचित त्यात उल्लेख केलेल्या त्या अंतःकरण कापत जाणाऱ्या वेदनेमुळे. काय असावी अशी वेदना. कधी जाणवते अशी अंतःकरण कापत जाणारी वेदना? मनाची वेदना. खर तर फार साध सरळ आयुष्य आहे माझ. अजून तरी काही फारशी वेडीवाकडी वळण नाहीत, कसले सल नाहीत. फार काही भव्यता नाही की कसले नेत्रदीपक विजय वा पराभव नाहीत. आपल्यापैकी बऱ्याच जणांच आयुष्य असाच असत. अश्या आयुष्यात जाणवते का कधी ती अंतःकरण हलकेच कापत जाणारी वेदना.
जेंव्हा ज्ञानेश्वरांसारखे विश्वाचे आर्त मनात प्रकाशते तेंव्हा ती जाणवते का? की भरभरून दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्याला जाणवते ती? आई-बाबांच्या अंतःकरणाला होत असेल का अशी हळूच टोचणारी वेदना, जेंव्हा मूल स्फुंदून रडू लागत. आणि खरच तेवढी तीव्र असते त्यांची वेदना?
खर सांगायचं तर मला भरभरून प्रेम करताच येत नाही. तर्काच्या खर तर व्यवहाराच्या कसोटीवर घेतो साऱ्या भावना घासून. आजूबाजूला पाहतो तेंव्हा वाटते सारे असच तर करतात. जगत असतो आपण, एका रेषेतल आयुष्य. पुढे जाण्यासाठी क्वचित ढकलतो कोणालातरी. वाईट वाटत तेंव्हा, पण एक आनंदही होतो, विजयाचा. कधी मी ही पडतो. दुसऱ्याने धक्का दिल्याने. राग येतो तेंव्हा. धक्का देणाऱ्याचा, स्वतःचा, जगाचा. पण ती आर्त वेदना नाही जाणवत हृदयात.
जीवनाची भव्यता, दिव्यता, सार असत मनाच्या एका कोपऱ्यात धूळ खात. वाटत कधीतरी त्याच आकर्षण. स्वतःच्या कोशातून बाहेर येत जीवनाला, जगाला सर्व अंगांनी कवेत घेण्याची उर्मी, उदात्त तत्वांसाठी लढण्याच आकर्षण, ते भव्य विजय आणि तेवढेच उदात्त पराभव, किंवा ते निखळ, निर्व्याज प्रेम करण...व्यवहाराच्या पलीकडे जाणार, साऱ्या जगाला कवेत घेऊ शकणार. अशा भव्यतेत, उदात्ततेत जाणवते का ही अशी आंतरिक वेदना. अशी वेदना ही आपल्या भोवतीच्या जगाशी, स्वला विसरून अन्य कोणाशी समरूप होण्याची सुरुवात, की ही वेदना म्हणजे या समरुपतेच पूर्णत्वाला पोचण?
समजत नाही मला. पण एक आकर्षण वाटत त्या आंतरिक वेदनेच, त्या अनुभूतीच. पण माझ्या सरधोपट आयुष्यात कधी मिळेल का ही अनुभूती?

3 comments:

  1. You look in a different mood all together - looks like as if you are inviting for that kind of a pain, why, just to experience it?????? I wish you get all the joy and happiness of this world and all pain run away from you like the darkness of the night with sunlight.

    ReplyDelete
    Replies
    1. मला वाटत अशी अनुभूती आणि अशी वेदनेची जाणीव होण्यासाठी सगळे काही गौतम बुद्ध नाही होऊ शकत. पण आपले आयुष्य सरळ आहे, आपण कोणावर अशक्य वाटावं अस प्रेम करत नाही म्हणून आपल्याला कसली जाणीव नाही किंवा जीवन म्हणजे काय हे आपल्याला समजत नाही अस नाही. मला तर या अगम्य तत्त्वज्ञानापेक्षा आयुष्यातल्या छोट्या सुंदर गोष्टींच जास्त आकर्षण वाटत. आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या भावनांना आपण त्यांनी न सांगताही समजून घेतल तरी खूप आहे. या अगम्य दुखला समजून घेण्यापेक्षा आयुष्यातल्या सुंदर गोष्टीतून स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना त्यात सामील करून घेता आला तरी जीवनाबद्दल बराच काही कळलं अस मला वाटत.

      Delete
    2. @ Malvani...thanks for your wishes...but I am not a sadist person...the pain that I mean is somewhere a process of understanding world better

      @ Suvarna...thanks for giving a thought on my blog...what u have said is right...for our simple life...but my blog is about attractions of breaking through the stereotype life...about plunging into the mystics of life or of world...about something that we may feel when our mind will liberate from routine, linear life that we all are used to

      Delete